श्री बालाजी

अनेक भक्तांच्या नवसाला पावणारे व त्यांचे मनोरथ पूर्ण करणारे. सर्व लोकांचं श्रद्धास्थान बनलेले असे हे पारोळे गावाचे जागृत आराध्य दैवत म्हणजे श्री बालाजी महाराज !

बालाजी महाराजांचे हे देवस्थान सुमारे २४० वर्षांचे जुने आहे. हे देवस्थान नयन मनोहर असून मंदीराच्या आवारात एक प्रशस्त दगडी प्रवेशद्वार आहे. त्यावर एक नगारखाना आहे. मंदीरासमोरच एक गरुड खांब आहे आणि मंदिराच्या गाभारयात उच्चासनावर विराजमान झालेली ११ इंच उंच असलेली पंचधातुंची गिरीच्या बालाजीची सुबक अशी मूर्ती; दर्शन होताच क्षणभर डोळे दीपून टाकणारी अशी ही मूर्ती !

यात्रेच्यावेळी वाहनावरून बालाजीची ही छोटीशी जड मूर्ती प्रत्यक्ष चैतन्यमय होऊन जड होते. भक्तांच्या मस्तकावरून लवकर खाली येत नाही. हा चमत्कार दरवर्षी हजारो भाविक भक्त प्रत्यक्ष पाहतात.

जीवनात आनंद व चैतन्य निर्माण करणारा श्री बालाजी महाराजांचा उत्सव दरवर्षी आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत मोठ्या उत्साहाने केला जातो. या पंधरा दिवसात मोठी यात्रा भरते. महाराष्ट्राच्या कानाकोपरयातून हजारो भाविक या उत्सवासाठी येतात व येथील श्री बालाजींची प्रेक्षणीय वाहने व रथ बघून डोळ्यांचे पारणे फेडून घेतात.

श्री बालाजीची मंदीरे गावोगावी पुष्कळ असतील, पण या गावी साजरा केला जाणारा उत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात कोठेही आढळून येत नाही. या उत्सवात धर्मभावनेच्या जागृतीसाठी व समाज प्रबोधनासाठी नामवंतांची कथाकीर्तनेही आयोजित केली जातात हे उल्लेखनीय आहे.

श्री बालाजीचा रथ महाराष्ट्रातील किंबहुना देशातील प्रसिद्ध असा रथ आहे. "वास्तुशास्त्र विशारदकांना विशेष अभ्यास करावयास लावणारा एक उत्कृष्ट रथ" या शब्दातच त्याचे महत्व सांगावे लागेल.

श्री बालाजी भक्त ‘गिरी शेट शिंपी’ यांचे स्मारक म्हणून ३३ फूट उंचीची गावाबाहेर स्मशानभूमीत १३ फूट चौरस आकाराची छ्त्री बांधलेली आहे. तेथे दरवर्षी भक्ताच्या भेटीला पालखीतून देव जात असतात. त्यामुळे पारोळ्याची स्मशानभूमी ही पावनभूमी बनली आहे.

अशा या श्री बालाजी संस्थानाचे पुजारयाचे काम गावातील पाठक घराण्याकडे आहे. पाठक घराणे निरपेक्ष नि:स्वार्थी बुद्धीने बालाजीची सेवा करणारे म्हणून लौकीकास पात्र ठरले आहे, हे अभिमानाने सांगावेसे वाटते.

पारोळे येथील भगवान श्री बालाजी महाराज यांच्या उत्सवाची माहिती -

श्री बालाजी महाराजांचा उत्सव मिती भाद्रपद वद्य १३ पासून सुरु होतो. भाद्रपद वद्य पक्ष हा पितृपक्ष म्हणून गणला जातो. त्या पितृपक्षात कोणत्याही शुभ कार्याचे मुहूर्त नसून वरील दिवशी सूर्योदयाच्या वेळेस ब्रह्म मुहूर्त म्हणून उत्सवाच्या मंडपाच्या खांबांची मुहूर्त मेळ (पूजा) करण्यात येते. तसेच भाद्रपद वद्य आमावस्येस पंचांगात दाखविल्यास त्या दिवशी ‘श्री’ची मिरवणूकीस सुरुवात होते.

‘श्री’ची मिरवणूक व वाहन यांच्यविषयी अधिक माहिती