वर
 

श्री बालाजी

वैशिष्ठ्यपूर्ण पारोळेभूमी -

एका भक्तासाठी स्वसंस्थान सोडून पारोळे गावी आपल्या भक्ताबरोबर वास्तव्य करुन राहणारया; आपल्या पदस्पर्शाने या गावाची सर्वभूमी पावन करुन टाकणारया व या जागृत दैवत होऊन बसलेल्या त्या लक्ष्मीरमणा बालाजी महाराजांची पारोळे ही पावनभूमी ! रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या माहेर व सासरशी संबंधीत आणि १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाशी निगडीत असलेली व ऎतिहासिक प्रसिद्धी लाभलेली पारोळ्याची ही प्रसवभूमी ! मराठी कादंबरी क्षेत्रात सामाजिक व ऎतिहासिक कादंबरयांचे जनक म्हणून समजल्या जाणारया ज्येष्ठ कादंबरीकार कै. ह. ना. आपटे या थोर व श्रेष्ठ साहित्यिकाची पारोळे ही जन्मभूमी ! तसेच इंग्रजांच्या पारतंत्र्याच्या काळात अनेक इंग्रज अधिकारयांना व विद्वानांना संस्कृत वाड़्मयाचे व भारतीय संस्कृतीचे तत्वद्न्यान समजावून सांगणारया महामहोपाध्याय व वेदांतवागीश कै. श्रीधर शास्त्री पाठक यांची पारोळे ही विद्वान भूमी ! तसेच कलावंत व कुशल, कसबी कारागीरांची पारोळे ही कलाभूमी !

गावाचे भौगोलिक स्थान –

रेखांशावर असलेले पारोळे हे गाव जळगाव जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्या ठिकाण असून मुंबई, नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर धुळे व जळगाव जिल्ह्याच्या मधभागी वसलेले आहे. त्याचे क्षेत्राफळ १.४५ चौ. मैल आहे. समुद्रासपाटीपासून पारोळे गावाची उंची ६०८ फूट आहे. येथील पावसाचे मान वाषिक २० फूट ते २५ फूट आहे. आरोग्याच्या दृष्टीने हवा कोरडी व चांगली मानवणारी आहे. १८८१ च्या जनगणनेप्रामाणे गावाची हल्लीची लोकसंख्या २५००० आहे.

पारोळे नावाची उत्पत्ती –

गाव चौकोनात बसविले असून त्यातील रस्ते रुंद, लांबच लांब व सरळ रेषेत दिसतात. या रस्त्यांवर मधून मधून पिंपळाचे व लहान लहान देवतांचे पार रांगेने म्हाणजे ओळीने बांधलेले आढळून येतात. म्हाणूनच या गावास पारांच्या ‘ओळी’ ‘पारोळी’ व नंतर अपभ्रंश होऊन ‘पारोळे’ हे नाव पडले.

गावाची सुरुवात व पूर्वेइतिहास -

इतिहासाच्या पुराणावरुन या गावाची सुरुवात सुमारे २६० वर्षांपूर्वी किल्ला बांधणीच्यावेळी झाली असावी असे वाटते. पन्नास घराचे खेडे असलेले गाव जहागीरदार हरी सदाशिव दामोदर यांनी तटबंदी असलेल्या शहरापर्यंत ब्रिटीश राजवटीच्या प्रारंभी उर्जीतावस्थेला आणलेले असावे. कारण किल्ला ज्या ठिकाणी बांधला आहे त्या ठिकाणी ५० घरांची पेंढारांची वस्ती येथे होती. त्याचा पुरावा म्हणून गावाचा एक भाग पेंढारपूरा म्हणून आजही प्रसिद्ध आहे. नंतर किल्ल्याच्या अनुषंगाने हळूहळू वाढत गेली. किल्लेदारांनी व्यापारांचे मन वळवून त्यांना आश्रय दिला. त्यांच्या व्यापारास उत्तेजन व संरक्षन दिले. अशातरहेने पेशव्यांचे सरदार नेवाळकरांच्या कारकिर्दीत हे गाव त्या काळी व्यापारीपेठ म्हणून भरभराटीस आले.

परंतु, पुढे इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला. त्यामुळे शिवाजीने स्थापलेले हिंदवी स्वराज्य लयास गेले. सारया महाराष्ट्रात इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली. अशा परिस्थितीतही इ.स. १८२१ साली पारोळे गावी व आसपासच्या परिसरात इंग्रज राजवटीविरुद्ध भयंकर असंतोष निर्माण होऊन बंड उदभवले. कॅप्टन ब्रिग्ज याच्या खूनाचाही प्रयत्न झाला. त्याचा परिणाम म्हणून जहागीरदारावर ब्रिटीश सत्तेचा ओढवला. कॅप्टन ब्रिग्ज याने किल्ला जिंकला व तो बळजबरीने जहागीरदारास सोडावयास भाग पाडला. पुढे इ. स. १८५७ च्या स्वातंत्र्य युध्दात झाशीच्या राणीस पारोळ्याच्या किल्लेदारांनी इंग्रजांविरुद्ध मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला व राणीचे नातलग म्हणून इ. स. १८५९ मध्ये त्यांच्या ताब्यातून किल्ला व शहर इंग्रजांनी घेतले. इ. स. १८६० मध्ये जहागीरी खालसा केल्यामुळे हे गाव जहागीरीतून कमी झाले. इ. स. १८६४ मध्ये नगरपालिकेची स्थापना होऊन त्यामार्फत गावाचा कारभार सुरू झाला.

गावाची ऎतिहासिक प्रसिद्धी -

पारोळे वीरांची वीरभूमी -

"पूर्व दिव्य ज्यांचे, त्यांना रम्य भावीकाल, बोध हाच इतिहासाचा सदा सर्वकाळ..." ज्या राष्ट्राचा पूर्वेइतिहास भव्य दिव्य असतो त्याचा भविष्यकाळ उज्वल व उत्कर्षाचा असतो; असा या पद्यपंक्तिचा अर्थ आहे. राष्ट्राच्या जीवनातील हा सिद्धांत गावालादेखील लागू आहे. यादृष्टीने विचार केला असता पारोळ्यासदेखील अशीच प्रेरणा देणारी, आम्हास भूषणावह असणारी आमच्या मनास कार्यप्रवृत्त करावयास लावणारी आणि विचाराला विवेकाने वागावयास लावणारी अशी इतिहासाची परंपरा आहे. कारण झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर व सासरचा उभय नात्यांशी संबंधीत असलेली पारोळ्याची ही वीरप्रसवाभूमी ! राणी लक्ष्मीबाई ही तांबेकूल वीरश्री ! तिच्या माहेरशी संबंधीत असलेले तांबे घराण्याचे वंशज अजूनही पारोळे गावी वस्ती करून आहेत. त्याचप्रमाणे सासरच्या नात्याकडून राणी लक्ष्मीबाई म्हणजे नेवाळकरांची कीर्ती ! अन नेवाळकर पेशव्यांचे सरदार ! त्यांचे जहागीरीतील हे गाव ! या नेवाळकरांनीच १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात राणी लक्ष्मीबाईस इंग्रजांविरुद्ध मदत केली. असे हे १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाशी निगडीत असलेले ऎतिहासिक पूर्वपरंपरा असलेले इतिहास प्रसिद्ध पारोळे शहर !

गावाचे मुख्य आकर्षण - भुईकोट किल्ला एक ऎतिहासिक स्थळ -

पारोळे गावात येणारया प्रवाशांस गावाजवळ येताच इतिहास प्रसिद्ध अशा मजबूत तटबंदीत असलेल्या भुईकोट किल्ल्याचे प्रथम दर्शन घडते. हा किल्ला म्हणजे गावाचे मुख्य आकर्षण होय. खानदेशामधील अत्यंत सुंदर व वास्तुशास्त्राचा अवशेषांपैकी वैभवाची आठवण करून देणारे स्थापत्यशास्त्राचे सर्वात सुंदर शिल्प म्हणजे पारोळ्यातील या भुईकोट किल्ल्याच्या अवशेषाकडे बोट दाखविता येईल.

हा किल्ला सपाट मैदानावर असून इ.स. १७२७ मध्ये जहागिरदार हरी सदाशिव दामोदर यांनी बांधला. ५२५ फूट लांब व ४३५ फूट रूंद आहे. किल्ल्याच्या तटाभोवती सर्व बाजूने पाण्याचे खंदक आहेत. पूर्वेस एक मोठा रूंद असा तलाव असून त्याला तीनही बाजूंनी पायरया आहेत. किल्ल्याचेभोवती दगड चुन्याने बांधलेला असा एक व आतील बाजूस दुसरा असा तट आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार पूर्वी एका लाकडी झुलत्या पुलाने व विशाल अशा उत्तुंग बुरूजांनी संरक्षिले होते. या लाकडी पुलावरुन पूर्वी किल्ल्यात जाता येत असे. नंतर दगडी बुरुज आहे. जहागिरदारांचा महाल आहे. किल्ल्यात अनेक लहान लहान विहिरी आहेत. किल्ल्याच्या तटाच्या भिंतीत व बुरुजात अनेक लहानमोठी छिद्रे असून त्यातून येणारया शत्रूवर बंदूकीच्या गोळ्यांचा अचूक मारा करता येत असे. किल्ल्यात एक भुयार घर आहे. ज्यातून एक घोडेस्वार जाऊ शकेल इतके ते लांब, रूंद व उंच असे मजबूत बांधणीचे असून त्याचे प्रवेशद्वार गावापासून ५ मैलावर असलेल्या नागेश्वर येथील महादेवाच्या मंदीराजवळ आहे. या किल्ल्यात प्राचीन असे एक महादेवाचे मंदीर असून ते ‘हर हर महादेव’ या रणगर्जनेचे मराठ्यांचे स्फुर्तीस्थान आहे.

हा किल्ला म्हणजे पारोळ्यांचे भूषण ! इतिहासाची परंपरा लाभलेले हे स्थळ म्हणजे पारोळ्याचे वैभव !

इतर स्थळे -

गावाच्या बाहेर अनेक जुन्या मशिदी आहेत. किल्ल्याच्या जवळच एक सुंदर असा मनोरा आहे. किल्ल्याच्या पूर्वबाजूला इमाम बादशहाचा दर्गा आहे. त्यात इमाम व बादशहा या दोन भावांच्या कबरी आहेत. हा दर्गा ३१ चोरस फूट आकाराचा व १५ फूट उंच आहे. मध्यभागी मोठा घुमट असून चारही कोपरयाला चार लहान लहान घुमट आहेत. हा दर्गा हिंदू जहागिरदार सदाशिव दामोदर यांनी बांधला असे म्हणतात. दरवर्षी श्रावण महिन्यात तीन दिवस या दर्ग्याचा ऊरुस भरतो.

दिल्ली दरवाज्यापासून वीस यार्डावर मिस्किनशा बाबा नावाच्या एका खुदाचे सेवकाचे एक रम्य स्मारक आहे. दिल्ली दरवाजा बांधकामातील ते एक कारागिर होते. ते एक "बहुत पहुचे हुए आदमी थे" या एका वाक्यात त्यांचे वर्णन केले तरी सार्थ आहे.

देवालयांची समृद्ध नगरी - पारोळ्याची भूमी !

मंदीरे व देवालये ही धर्म जागृतीची संघटनेची आणि संस्कृती जोपासनेची व संवर्धनाची साधने मानल्यास पारोळ्याच्या भूमीस हा सांस्कृतीक वारसा फार मोठ्या प्रमाणात लाभला आहे असे म्हणावयास हरकत नाही. प्राचीन देवालये आणि विविध धर्मपंथियांची श्रद्धास्थाने असलेला पारोळ्याचा परिसर महाराष्ट्रातील दूरवर विखुरलेल्या भाविकांचे मोठे आकर्षण होय.

१) श्री बालाजी देवस्थान -

अनेक भक्तांच्या नवसाला पावणारे व त्यांचे मनोरथ पूर्ण करणारे. सर्व लोकांचं श्रद्धास्थान बनलेले असे हे पारोळे गावाचे जागृत आराध्य दैवत म्हणजे श्री बालाजी महाराज ! बालाजी महाराजांचे हे देवस्थान सुमारे २४० वर्षांचे जुने आहे. गावाच्या मध्यभागी हे लोभनीय असे मंदीर असून त्याचा जीर्णोद्धार संवत १९८१ मध्ये श्री वल्लभदास मुरलीधर गुजराथी येवल्याचे गंगाराम छबीलदास पेढीच्या मालकाने तीस हजार रुपये खर्च करुन केला.

हे देवस्थान नयन मनोहर असून मंदीराच्या आवारात एक प्रशस्त दगडी प्रवेशद्वार आहे. त्यावर एक नगारखाना आहे. मंदीरासमोरच एक गरुड खांब आहे आणि मंदिराच्या गाभारयात उच्चासनावर विराजमान झालेली ११ इंच उंच असलेली पंचधातुंची गिरीच्या बालाजीची सुबक अशी मूर्ती; दर्शन होताच क्षणभर डोळे दीपून टाकणारी अशी ही मूर्ती !

यात्रेच्यावेळी वाहनावरून बालाजीची ही छोटीशी जड मूर्ती प्रत्यक्ष चैतन्यमय होऊन जड होते. भक्तांच्या मस्तकावरून लवकर खाली येत नाही. हा चमत्कार दरवर्षी हजारो भाविक भक्त प्रत्यक्ष पाहतात.

जीवनात आनंद व चैतन्य निर्माण करणारा श्री बालाजी महाराजांचा उत्सव दरवर्षी आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत मोठ्या उत्साहाने केला जातो. या पंधरा दिवसात मोठी यात्रा भरते. महाराष्ट्राच्या कानाकोपरयातून हजारो भाविक या उत्सवासाठी येतात व येथील श्री बालाजींची प्रेक्षणीय वाहने व रथ बघून डोळ्यांचे पारणे फेडून घेतात.

श्री बालाजीची मंदीरे गावोगावी पुष्कळ असतील, पण या गावी साजरा केला जाणारा उत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात कोठेही आढळून येत नाही. या उत्सवात धर्मभावनेच्या जागृतीसाठी व समाज प्रबोधनासाठी नामवंतांची कथाकीर्तनेही आयोजित केली जातात हे उल्लेखनीय आहे.

श्री बालाजीचा रथ महाराष्ट्रातील किंबहुना देशातील प्रसिद्ध असा रथ आहे. "वास्तुशास्त्र विशारदकांना विशेष अभ्यास करावयास लावणारा एक उत्कृष्ट रथ" या शब्दातच त्याचे महत्व सांगावे लागेल. १९६१ साली हल्लीच्या या रथाच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्न झालेत. त्यावेळी ७० हजार रुपयात हा ३५ फूट उंचीचा कित्येक टन वजनाचा लाकडी रथ श्री माधव रामजी मिस्त्री यांनी आपल्या बंधूंच्या मदतीने पूर्ण केला.

शहरातील गैरसोयींचा विचार करून सर्व सुविधापूर्ण प्रशस्त असे मंगल कार्यालय उभारण्याचा मंदीराच्या विश्वस्तांचा संकल्प पूर्ण होत चालला आहे. ही देखील त्या बालाजी मंदीराची कृपा आहे.

श्री बालाजी भक्त ‘गिरी शेट शिंपी’ यांचे स्मारक म्हणून ३३ फूट उंचीची गावाबाहेर स्मशानभूमीत पारोळे-धुळे रस्त्यावर एक सुंदर दगडी चुना विटांची १३ फूट चौरस आकाराची छ्त्री बांधलेली आहे. तेथे दरवर्षी भक्ताच्या भेटीला पालखीतून देव जात असतात. त्यामुळे पारोळ्याची स्मशानभूमी ही पावनभूमी बनली आहे. हल्ली भग्नावस्थेत असलेल्या या छ्त्रीचे नव्याने बांधकाम श्री बालाजी संस्थानाने सुरु केले आहे. ती वास्तूसुद्धा अतिसुंदर होणार हे निश्चित.

अशा या श्री बालाजी संस्थानाचे पुजारयाचे काम गावातील पाठक घराण्याकडे आहे. पाठक घराणे निरपेक्ष नि:स्वार्थी बुद्धीने बालाजीची सेवा करणारे म्हणून लौकीकास पात्र ठरले आहे, हे अभिमानाने सांगावेसे वाटते.

२) जनार्दन मंदीर -

या मंदीराचे मूळ नाव ‘केशव राजदेव मंदीर’ असे आहे. सुमारे २२५ वर्षांपूर्वींचे हे प्राचीन असे मंदीर आहे. पाच फूट उभी चतुर्भज स्वयंभू जनार्दनाची मुर्ती हे या मंदीराचे वैशिष्ट आहे. एवढी भव्य व प्राचीन मूर्ती गावात कोणत्याच मंदीरात नाही. या मंदीरासंबंधी एक आख्यायिका आहे ती अशी -

पुणतांबे या गावाहून श्री. मेघशाम उपासनी हे गृहस्थ नेवाळकरांच्या जहागिरीत पारोळे गावात राहण्यासाठी आले. तेव्हा वस्ती फक्त पेंढारपूरा भागातच होती. लवण्याच्या काठी काही झोपड्या उभारल्या जात होत्या. श्री उपासनींनी अशीच एक झोपडी लवण्याच्या काठावर बांधली व त्यात राहू लागले. सर्वांना पाणी पुरावे म्हणून या कुटुंबातील लोकांनी झिरा खोदता खोदता एक दगड लागला. तो खूपच मोठा होता. कोरता कोरता मूर्तीचा हात लागला व पालथ्या स्थितीत ही मूर्ती आढळून आली. असे म्हणतात की, १०० बैलगाड्या ओढण्यासाठी लावल्या. सर्व लोक जमले, पण मूर्ती हलली नाही. शेवटी महालकरीच्या स्वप्नात त्यांना दृष्टांत झाला की, "मी जेथे आहे तेथेच माझी स्थापना करा." त्याप्रमाणे या झोपडीवर मंदीराचे काम झाले. सुरुवातीला मंदीर दुमजली बांधले होते. विष्णूयोग झाला तेव्हा अवघ्या पाच जणांनी मुर्ती उचलून आता ज्या जागी आहे त्या जागी बसविली.

जहागिरी खालसा झाल्यावर व्हिक्टोरीया राणीच्या काळात मंदिरास इनामी जमीन मिळाली. हल्ली पुजारयांची सातवी पिढी आहे. अद्न्यान वारस शामकांत देवळे आहेत. रामनवमी, गोकुळ अष्टमी व अधिक मासात काकडआरती हे उत्सव मंदिरात साजरे होत असतात.

३) श्रीराम मंदीर -

हे कोरीव दगडी देऊळ आहे. प्रशस्त भव्य दगडी असे प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या आवारात भव्य पटांगण आहे. उंबरदास महाराज हे या मंदिराचे संस्थापक आहेत. त्यानंतर पुरुषोत्तमदास महाराज, लालीदास मथुरादास, छगन महंत असे हे गोस्वामी बैरागी पुजारी होत. यांनी मंदिराची सुधारणा करुन मंदीर सुस्थितीत ठेवले आहे. मंदिराच्या पवित्र व शांत प्रांगणात मारुतीची भव्य मूर्ती असलेले मंदीर आहे. समर्थ रामदास स्वामी यांचे हातून या मंदिराची स्थापना झाली असे म्हणतात. मंदिरातील मुर्ती जयपूरहून बनवून आणल्या जात असत. मंदिरात रामनवमी, गोकुळ अष्टमी, हनुमान जन्म इ. उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. मंदिराबाहेर एक धर्मशाळा आहे. तेथेही महादेवाचे दगडी मंदीर आहे.

४) संतोषी माता मंदीर -

श्रीराम मंदिराच्या आवारातच पारोळ्याच्या नवयुवक मंडळाने अत्यंत आधुनिक बांधकाम करून संतोषी मातेचे नवीन मंदीर बांधले व त्यात संतोषी मातेची संगमरवरी मूर्ती बसविली आहे. ती सव्वाचार फूट उंचीची - चतुर्भूज - सतत प्रसन्नवदना व हास्यवदना अशी आहे. या मंदिरात सकाळी भक्तीगीते व स्वाध्यायीगीते ऎकविले जातात. पारोळ्याच्या वैभवात भर टाकणारे हे एक सुंदर मंदीर आहे.

५) हिंगलाज माता मंदीर -

कथा माता पार्वतीदेवी व श्री भगवान शंकरजी हे एकेकाळी द्युत खेळावयास बसले. त्यात भगवान शंकरजी हरले. पार्वतीमातेने जिंकले. म्हणून श्री भगवान शंकरजी खिन्न झाले. पुढे दक्ष राजाने यद्न्य समारंभ केला. त्यावेळी त्याने भगवान शंकरांना मुद्दाम बोलावले नाही. कन्या म्हणून पार्वतीदेवी पाचारण नसतानाही व श्री भगवान शंकराने नकार दिला असतानाही यद्न्य समारंभास गेली. तेथे पार्वतीदेवीचा अपमान झाला. तो सहन न होऊन देवीने होमकुंडात उडी घेऊन स्वतःस जाळून घेतले. पुढे तिचा जन्म हिमालयाच्या पोटी झाला. तिचे लग्न परत भगवान शंकराशी घडून आले. त्यावेळी लोक देवीस ‘हिंगलाज माता’ असे म्हणू लागले.

६) किल्ल्यातील महादेवाचे मंदीर -

किल्ल्यात एक महादेवाचे प्राचीन मंदीर होते. ते किल्ल्याची पडझड झाल्यामुळे जमिनीत खोलवर गाडले गेले होते. त्याची जनतेला विशेष माहिती नव्हती; परंतु एका भक्ताला झालेल्या दृष्टांताने याचे उत्खनन होऊन मंदिराचा जिर्णोद्धार झाला. नंतर ब्राम्हणांकरवी शिवपिंडाची प्राणप्रतिष्ठा व रुद्राभिषेक केला गेला. हे जागृत देवस्थान समजले जाते.

७) स्वामी मंदीर -

या मंदिरास ‘हरेश्वर मंदीर’ असे ही म्हणतात. पारोळे एस. टी. स्टँड व गावाची दक्षिण बाजू या मधील शेतात हे प्राचीन मंदीर आहे. मंदिरात महादेवाची पिंड आहे. हे मंदीर श्री. त्र्यंबकराव सदाशिवराव जहागिरदार यांनी बांधलेले आहे. हे मंदीर म्हणजे एक २४ बाय २४ चौरस फूट अशी सुंदर दगडी इमारत आहे. मंदिराची उंची ४० फूट आहे. मंदिरावर सुवर्ण कळस बसविला आहे.

८) विठ्ठल मंदीर -

पारोळे गावातील कै. ह. ना. आपटे रोडवर हे प्राचीन मंदीर आहे. मंदिरात विठ्ठल-रुख्मिणी यांची मूर्ती खूपच सुंदर असून दीड फूट उंचीच्या चौथरयावर उभ्या आहेत. या मंदिराचे अर्चक म्हणून संत घराण्याची नववी पिढी आहे. मंदिरात दरवर्षी आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्याप्रसंगी नामसप्ताह व कथाकिर्तन प्रवचनांनी कार्यक्रम आयोजित केले जातात. या मंदिरासमोरच मारुतीचा पार असून औदूंबराची छाया सुखद वाटते. या विठ्ठल मंदीराशेजारीच प्राचीन व भरभक्कम बांधणी असलेले मोठ्या महादेवाचे मंदीर आहे. मंदिरात मोठा गाभारा असून मोठा दगडी नंदी खूपच प्रेक्षणीय आहे.

९) श्री द्वारकाधीश मंदीर -

शहरातील प्रमुख जवाहर पथावरील चावडीलगत श्री द्वारकाधीश मंदीराची पुरातन भव्य वाड्याच्या स्वरुपात वास्तू उभी आहे. दर्शनी दगडी भव्य कोरीव कमानीचे प्रवेशद्वार असून आतील प्रांगणालयात मंदिराची वास्तू आहे. आत श्री द्वारकाधीशाची मूर्ती चांदीचे पाळण्यात विराजमान झालेली आहे. गुजराथी लोकांचे हे श्रद्धास्थान आहे. श्रावण महिन्यात गोकुळ अष्टमीचा उत्सव साजरा केला जातो. तसेच वेगवेगळ्या हिंदोळ्यांचा आरास केला जात असून दिपवाळीत अन्नकोटाचा वार्षिक सामुदायिक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतो.

१०) झपाट भवानी मंदीर -

पारोळे गावाच्या ईशान्य दिशेस जहागिरदार श्री. त्र्यंबकराव सदाशिवराव यांनीच हे मंदीर बांधलेले आहे. त्यांचा बैठा पुतळा मंदिरात आजही पाहावयास मिळतो. या मंदिरात चार हात असलेली गणपतीची व देवीची प्राचीन मूर्ती पाहावयास मिळते. जुनी मूर्ती देवीची - दगडाची होती. आता संगमरवरी मूर्ती बसविण्यात आलेली आहे. हे मंदीर ५८ फूट लांब व ५६ फूट रुंद असून त्यालाही विटांचा बांधणीचा कळस आहे. तेथे एक सुंदर नक्षीकाम केलेली छ्त्री प्रवेशद्वाराजवळच आहे. येथे दरसाल देवीची यात्रा अक्षय तृतीयेस भरत असते. त्या यात्रेच्या वेळी पतंगाचा चढाओढीचा व देवीच्या भक्तांकडून माणसांनी भरलेल्या बैलगाड्या ओढण्याचाही प्रेक्षणीय व आश्चर्यकारक कार्यक्रम होतो.

११) पांडुरंग मंदीर -

गावात श्री पिले यांचे खाजगी मालकीचे पांडुरंग मंदीर आहे. पांडुरंग महाराज हे घराण्यातील एक सद्पुरुष ! त्यांचे हे मंदीर ! या मंदिरात धार्मिक उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम नेहमी होतात. हे मंदीर म्हणजे भावी पिढी घडविणारे एक संस्कार केंद्रच होय, असे म्हणावयास हरकत नाही. या व्यतिरिक्त गावात नगर परिषदेच्या मालकीचे विघ्नहर्ता ‘श्री गणपती मंदीर’, पाठक कंपनीलगतचे पातालेश्वराचे मंदीर, भाटेवाडीचे बाजूचे दक्षिणाभिमुख मारुतीचे मंदीर, जवाहर पथावरील गणपती, महादेव व मारुती आणि महानुभावपंथींचे एकमुखी दत्तमंदीर इत्यादी मंदिरे आणि गावाबाहेरील अमळनेर रस्त्यावरील शनी मंदीर, उंदीरखेडे रस्त्यावरील श्री देवीचे मंदीर, धुळे रस्त्यावरील श्री सत्यनारायण मंदीर इत्यादी मंदिरे शहराच्या वैभवात भर टाकीत आहेत.

कलावंतांची व कुशल, कसबी कारागिरांची नगरी - पारोळ्याची भूमी !

पारोळ्याची भूमी ही कलावंतांची व कुशल, कसबी कारागिरांची भूमी आहे. गायक, वादक, साळी, खत्री, सोनार, सुतार इत्यादी उत्कृष्ट कलाकार व कारागीर या भूमीत होऊन गेलेत. बालगंधर्व जळगावी आले तर त्यांच्या गायनाला साथ देणारे उत्कृष्ट पेटी व तबला वादक येथे होऊन गेलेत. बडोदे संस्थानिकांनी गौरविलेले उत्कृष्ट शहनाईवादक श्री भिला गुरव याच गावी होऊन गेलेत. आपल्या ढोलकीने व लोकनाट्याने ज्यांनी महाराष्ट्रातील लोकांचे मनोरंजन केले. त्या धोंडूकोंडू या कलाकारांचा फड पारोळ्याच्या भूमीतच झाला. आजही या गावातील सुतार कारागिरांनी केलेल्या उत्कृष्ट लाकडी बैलगाडींना महाराष्ट्रातील कानाकोपरयातून मागणी येत असते. आजही या पारोळ्याच्या भूमीत धातूकामाचे ठसे बनविण्याच्या व्यवसायात जडे घराणे आहेत. भारत सरकारकडून राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवपत्र मिळविणारे सोनार कारागिर आहेत. गावातील प्रसिद्ध रथ, बालाजीची वाहने व त्यावरील लाकडी बाहुल्यांचे काम करणारे उत्कृष्ट कारागीर ज्या भूमीत झालेत त्या कुशल, कसबी कारागिरांची व कलावंतांची पारोळे ही कर्मभूमी !

पारोळे नगरातील – नररत्न

१) ज्येष्ठ कादंबरीकार कै. हरीभाऊ नारायण आपटे -

यांचा जन्म पारोळे येथे दिनांक ८ मार्च १८६४ रोजी झाला. हरीभाऊ म्हणजे महाराष्ट्र सारस्वतातला एक दैदिप्यमान तारा ! विपुल व लोकप्रिय ग्रंथ रचना करणारे हरीभाऊ हे मराठीतील पहिलेच लेखक होत. सामाजिक व ऎतिहासिक कादंबरयांचे जनक म्हणून त्यांची कीर्ती सर्वत्र आहे. ४२ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी २१ कादंबरया, ५ नाटके, ३ प्रहसने, ४ स्फूट गोष्टींचे भाग, कविता, निबंध, पत्रे इ. साहित्य संपदा निर्माण केली. त्यांनी आपल्या साहित्य निर्मितीद्वारा सत्वहीन बनलेल्या जनतेत स्वाभिमान व देशाभिमान जागृत केला. ते एक राजकीय द्रष्टेही होते. अशा या श्रेष्ठ साहित्यिकाचा जन्म पारोळ्याच्या भूमीत झाला. हे गावास भूषणावह ! कै. हरीभाऊ म्हणजे पारोळ्याच्या भूमीतील एक अनमोल रत्न !

२) महामहोपाध्याय व वेदांतवागीश - कै. श्रीधर शास्त्री पाठक (उर्फ प. पं. शंकरानंद भारती)

यांचा जन्म पारोळे येथे दि. १३/०२/१८७८ या दिवशी झाला. त्यांनी आपले संस्कृत भाषेचे व प्राचीन वैदिक वाङमयाचे शिक्षण नाशिक, इंदूर व काशी येथे अतिशय परिश्रमपूर्वक व विद्वान गुरुजनांकडून संपादन केले. पुणे येथील डेक्कन कॉलेज, मुंबई येथील एल्फीस्टन कॉलेज येथे प्रोफेसर म्हणून संस्कृतच्या विषयाचे अध्यापनाचे कार्य यशस्वीरित्या पार पाडले. अनेक विद्बतजनांना संस्कृतचे तत्वद्न्यान समजावून सांगितले. शेवटी संन्यास पत्करुन उर्वरित आयुष्य ब्रर्ह्मावर्त (कानपूर) येथे घालविले.

पारोळ्याच्या या द्वय नररत्नांनी आपल्या गुणांनी व द्न्यानानी पारोळे नगराची कीर्ती-पताका अखिल भारतात व भारताबाहेर परदेशातही फडकवित ठेवली आहे हे निश्चितच ! म्हणून पारोळ्याची भूमी म्हणजे श्रेष्ठ साहित्यिकांची व विद्वानांची भूमी होय.

पारोळ्याची पंचक्रोशी (पवित्र व पावन)

पारोळ्याची भूमी ऎतिहासिक प्रसिद्धी लाभलेली, देवालयांनी समृद्ध अशी व कलावंतांची कारागीराची भूमी म्हणून व नररत्नांनी पावन म्हणजे अशी प्रसिद्ध भूमी आहे. त्याप्रमाणे तिची पंचक्रोशीदेखील पवित्र व पावन अशी आहे.

पारोळ्याच्या दक्षिणेस दोन मैलांवर उंदिरखेडे या गावी माधवनाथ महाराज यांच्या शिष्या ‘निजानंदी ताई महाराज’ यांचा मठ आहे. स्वतःच्या आत्मिक, आध्यात्मिक सामर्थ्याने व आचरणाने त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली असून महाराष्ट्रात दूरवर यांचा शिष्यागण विखुरलेला आहे. भारतीय तत्वदन्यानाचा प्रचार प्रसाराचे महान राष्ट्रीय कार्य ते करीत आहेत.

उंदिरखेड्याच्या पुढे तीन मैलावर ‘नागेश्वर’ हे धार्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथील महादेवाचे मंदीर रमणीय आहे. प्रशस्त असे प्रांगण आहे. पारोळ्यातील प्रसिद्ध अशा ऎतिहासिक किल्ल्यातील भुयार घराचे प्रवेशद्वार या महादेवाच्या मंदिराजवळ उघडले आहे. जवळच एक तलाव आहे. थोड्या अंतरावर बोरी नदिही आहे. आजूबाजूचा परिसरही निसर्गरम्य आहे. वनसंपत्तीच्यादृष्टीने व वन विकासाच्या दृष्टीने प्रगतीस मोठा वाव आहे. महाशिवरात्रीस मोठी यात्रा भरते. आजूबाजूच्या परिसरातील हजारो लोक यात्रेस येतात.

पारोळेपासून आठ मैलावर चोरवड हे गाव आहे. हे महानुभव पंथीयांच्या क्षेत्रांपैकी एक प्रसिद्ध असे क्षेत्र आहे. येथे महानुभाव एकमुखी दत्ताचे मंदीर आहे. दत्त जयंतीस मोठ्या प्रमाणात यात्रा भरते.

पारोळे गावाच्या पश्चिमेस दोन मैलांवर कंकराज खेडेगावात गोरखनाथाचे मंदीर असून हे पवित्र ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. पुढे सहा मैलावर बहादरपूर गाव आहे. हे धार्मिक स्थळ असून येथील श्री बद्रीनारायणाचे मंदीर प्रसिद्ध आहे. येथे कार्तिक महिन्यात यात्रा भरत असते.

गावाच्या उत्तर पश्चिमेस बारा मैलावर अमळनेर शहर आहे. हे शहर म्हणजे श्री संत सखाराम महाराजांची पावनभूमी, सानेगुरुजींची कर्मभूमी व प्रताप शेटजींची दानशूर भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. असेच येथील तत्वद्न्यान मंदीर देशात प्रसिद्ध आहे.

पारोळे गावाच्या पूर्वेस दोन मैलांवर म्हसवे या छोट्या खेडेगावी ‘अंजनी देवी मातेचे’ मंदीर असून जवळील दगडी हालते झुलते मनोरे प्रेक्षणीय आहेत. जवळच तलाव असून तो फाईलचा तलाव म्हणून प्रसिद्ध आहे. आजूबाजूचा परिसरही निसर्गरम्य व मनोहारी असा आहे. तसेच येथून पुढे ‘फरकांडे’ या गावातील झुलते मनोरे रम्य व प्रेक्षणीय असे आहेत.

गावाच्या पूर्वेस पंधरा मैलांवर ‘एरंडोल’ हे तालुक्याचे ठिकाण आहे. महाभारतकालीन ‘एकचक्रानगरी’ म्हणून या नगराचा उल्लेख केला जातो. अजूनही या नगरीतील ‘पाच पांडवांचा वाडा’ प्रसिद्ध आहे. येथून जवळच पद्मालय हे क्षेत्र श्री गणेशाचे पावन तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. तेथे श्री गणेशाचे मोठे भव्य दिव्य देवालय आहे. महाभारतातील भीमाने बकासूराचा वध केला ते ठिकाण येथेच असून ‘भीमकुंड’ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील डोंगर निसर्गरम्य असून वनश्रीची शोभा आल्हाददायक व नयनमनोहारी आहे.

अशी ही पारोळ्याची पंचक्रोशी धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेली, वनश्रीच्या सौंदर्याने नटलेली व पारोळ्याच्या भूमीचा महिमा व महत्व वाढवणारी असून सार्थ अभिमान बाळगावा अशीच आहे.

आज या पारोळ्याच्या भूमीत द्न्यानगंगेचा प्रवाह चहूबाजूंनी वाहत आहे. गावाच्या बाहेरील राष्ट्रीय महामार्गावरील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा पुतळा स्वराज्य आणि स्वातंत्र्य प्रेम जागृत करून राष्ट्रभिमानी आणि पराक्रमाची स्फूर्ती सारया गावाला देत आहे.

पारोळे तालुक्याची लोकमाता समजल्या जाणारया बोरी नदीवरील हा जनकल्याणकारी प्रवाह आणि होऊ घातलेल्या भोकरवाडी या छोट्या धरणावरील जनकल्याणकारी प्रवाह हे पारोळे तालुक्याचे उद्याच्या आशेचे किरण आहेत.

अशा या धार्मिक व पावन पंचक्रोशीत असलेल्या पारोळ्याच्या भूमीत गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी व सर्वसामान्य नागरीकांसाठी सार्वजनिक उद्यान असणे आवश्यक आहेत. विशेषतः किल्ल्यात, श्रीराम मंदिरात व झपाट मंदिराच्या परिसरात असणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरसौंदर्यांत मोठी भर पडणार आहे. सांस्कृतिक विकासासाठी रंगमंच - खुले नाट्यगृहे होणे आवश्यक आहे. शारिरीक विकासासाठी क्रिडांगण, पोहोण्याचे तलाव यांची आवश्यकता आहे. तसेच गावाचा आर्थिक विकासासाठी लघुउद्योग धंदे सुरु होणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टींची भविष्यात पूर्णतः होणे ही प्रभूचरणी प्रार्थना !